मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गडकरी आज शनिवारी सकाळी पहिल्यांदाच नागपुरात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी नितीन गडकरी यांच्याकडील आधीची जल वाहतूक, जलसंपदा, नमामि गंगे ही मंत्रालये काढून घेण्यात आली आहेत. मात्र, त्यांचे आवडते भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कायम ठेवत जोडीला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत गडकरी म्हणाले, देशातील रोजगार वाढावा व बेरोजगारीची समस्या सुटावी या हेतूनेच पंतप्रधानांनी आपल्यावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविली आहे. देशाचा जीडीपी वाढवणे आणि रोजगार निर्मिती करणे हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. लघु उद्योग आणि रोजगार निर्मिती करणे हे माझ्यापुढचे लक्ष्य आहे. अजून कोणतेही टार्गेट सेट केलेले नाही. नवीन योजना आणायच्या आहेत.
ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाईल. विविध भागात रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या लगत 125 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, मला जे खाते मिळाले आहे, त्याबाबत मी अजिबात नाराज नाही. रोजगारनिर्मिती करण्याची ही मला मिळालेली उत्तम संधी आहे असे मी मानतो. देशात महामार्गाच्या कडेला 125 कोटी झाडे लावणार आहे. गंगा शुद्धीकरण संदर्भात अनेक कामे झाली आहेत. मंत्रिमंडळात असलेले नवीन मंत्री ही कामे समोर घेऊन जातील.
खादी ग्रामोद्योग, कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यावर आपला अधिक भर राहील. खादीची निर्यात, मधाची निर्यात वाढवणे हे सध्या लक्ष्य ठेवले आहे. माझे काम जास्तीत जास्त करणार, मी सर्वाधिक कार्यक्षम मंत्री आहे की नाही हे लोकांनी ठरवायचे आहे. मी स्वतः जेवढे काम करायचे तेवढे करत राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.